चला, माणूस होऊ या.
© डा. चन्द्रहास सोनपेठकर
"केवळ स्वतः नाही, आपल्या समवेतची प्रत्येक व्यक्ती आनंदी असायला हवी." असं ज्याला वाटतं तो माणूस.
पण माणसाच्या या माझ्या व्याख्येत जगातील किती टक्के मनुष्याकृती प्राणी येतील, प्रश्नच आहे. खरं तर भगवंताची सर्वात सुंदर कलाकृती म्हणजे माणूस. पण
किती त-हा आहेत, या माणसाच्या?
काही तर कसे कुणाला दुखावता येईल, म्हणून टपलेले. त्यांचे विषयी विचार करणे म्हणजे चित्त मलीन करून घेणे.
काही दुखावत नाहीत, पण स्वार्थासाठी अंध झालेले.
साध्या राहण्यापेक्षा साध्या बोलण्यावर विश्वास ठेवायला हवा. साधं म्हणजे सरल पण कोणाचंही मन दुखावलं जाणार नाही, असं बोलणं. हे साधं बोलता येणं सोपं नाही. त्यासाठी तुम्ही माणूसच असावं लागतं. मैथिलीशरण म्हणतात तसे; मानवच आहे की, तो आपल्या कृतीने देव आणि दानव काहीही होऊ शकतो.
दुस-याला आनंदी पाहता न येणं दानवाचं लक्षण.
समवेतची प्रत्येक व्यक्ती आनंदी असायला हवी; असं वाटणं मानवाचं लक्षण.
न्याय करणं हे देवाचं लक्षण.
क्षमा करून व्यक्तीच्या आनंदासाठी प्रयत्न करणं; हे संताचं लक्षण.
कधी कधी वाटतं वय मोजता येतं, वाढ मोजता येते. मानसशास्त्रीय चाचण्या वापरून विकासाचा अंदाज घेता येतो. पण माणूसपणाचं काय? काही तरी एकक असायला हवं होतं. पण तरीही मननात् मानवः। म्हणजे मनन करणे, सखोल विचार करणे हेच खरं माणूसपणाचं व्यवच्छेदक लक्षण मानलं पाहीजे.
पैसा, स्थिरता किंवा समोर उपस्थित असलेल्या व्यक्तीपेक्षा एखादी भौतिक बाजू आपली भक्कम आहे, म्हणून अहंकार करणारी शेकडो माणसं दिसतात. तेव्हा वाटतं; किती मोठा टप्पा पार करायचायं माणूस होण्यासाठी.
दैवी समाजाचं स्वप्न पाहणा-या योगी अरविंदांची, समतेचा संदेश देणा-या संतांची, सुधारकांची, व्यक्ति स्वातंत्र्याचा पुरस्कार करणा-या स्मिथची माफी कशी मागावी, हेच समजत नाही.
चला, परस्परांना माणूस होण्यासाठी शुभेच्छा देऊ या.
जय श्रीकृष्ण!
No comments:
Post a Comment