Thursday, 29 September 2016

Dr. Durgade sir: An inclusive personality

मा. प्रा. डाॅ. दुर्गाडे सर: सर्वसमावेशकतेचे दुसरे नाव

गेली पाचवर्षाहून अधिक काळ आम्ही टिळक महाविद्यालयात एकत्र आहोत. अर्थात दुर्गाडे सर खूप सिनिअर आहेत. सरांची राजकारण समाजकारण अर्थकारण आणि शिक्षण या चारही क्षेत्रात जबरदस्त पकड आहे. सर्वप्रकारची यशस्विता असूनही विनम्रता असणं गुणग्राहकता असणं आणि सर्वसमावेशकता असणं या तीन गोष्टी सरांकडे अशा आहेत; ज्या कोणाच्याही मनाला सहज भावतील.
          राजकारणात सक्रिय असूनही सर विरोधासाठी विरोध कधीच करीत नाहीत. एखाद्या व्यक्तीचे एखाद्या बाबतीतील विचार  त्यांच्यापेक्षा कितीही भिन्न असले, तरीही समोरच्या व्यक्तीच्या विचारस्वातंत्र्याचा सर नेहमीच संमान करतात. कोणत्याही सकारात्मक कार्याला प्रोत्साहन देतात.
            दिवसभराचे व्यस्त असे भौतिक आणि बौद्धिक वेळापत्रक सर सांभाळतात. हे कौशल्य त्यांच्याकडून शिकलं पाहीजे. बरं इतक्या व्यस्ततेतून सर वाचनासाठी केव्हा आणि कसा वेळ काढत असतील, हे त्यांनाच माहीत!
            राजकारणात दुर्मीळ होत चाललेला साधेपणा त्यांनी जपलांय. त्यांनी समाजकारणात वैचारिक एकसूरीपणाला थारा दिलेला नाही. आर्थिक चिंतनातही डाव्या किंवा उजव्या विचाराच्या आग्रहापेक्षा संयुक्तिकतेला महत्व दिलंय. प्रबोधन, सुधारणा, बुद्धीप्रामाण्य, पुरोगामीत्व हे जसे त्यांच्या चिंतनाचे अविभाज्य भाग आहेत, तसेच कृतीचेही! पण तरीही "माझेच खरे" हा आग्रह नाही. तर "खरे ते माझे" अशी भूमिका सरांची असते.
             लोकशाही मूल्यांबद्दल त्यांच्या मनात कमालीचा आदर आहे. हे मी अनुभवाने सांगू शकतो. कारण एकूण विचार क्षेत्राच्या किमान 10% विचारांत तरी आमच्यांत मतभिन्नता असण्याची शक्यता आहे. पण तरीही सरांसोबत काम करताना, चर्चा करताना कधी दडपण येत नाही. नक्कीच; दुर्गाडे सरांनी सर्वसमावेशकता जपली आहे.....

Friday, 16 September 2016

हसायला लावणारी माणसं...!

हसायला लावणारी माणसं...!     
            हसायला लावणा-या प्रेमळ माणसांनी अशी काही साथ दिली की, वेळ फक्त हसण्यासाठीच राहीला. एखाद्या कुशल डाॅक्टर सारखं हसत हसवत हृदय बाहेर काढलं. काॅर्बोरेटर ऑईलनं साफ करावं, तसं आशीर्वाद आणि शुभेच्छांच्या स्निग्धतेने हृदय स्वच्छ केले. आणि निखळ हास्य तेवढं हृदयात ठेवलं.
        काहींनी तर जोरात हसलं पाहीजे म्हणून लडिवाळ हट्टच धरला. काहींनी हसल्यावर असे काही प्रोत्साहन दिले की, हसणं मनमुराद होऊन गेलं.
        असं वाटतं की, हसणं हे फक्त भौतिक नसतं, ते केवळ मानसिक देखील नसतं. हसणं ही हृदयाला जाणवलेल्या आध्यात्मिकतेची भौतिक अभिव्यक्ती असते. बुद्धीची खिडकी हळुवार बंद केली की, मनाचं अगदी आतलं दालन उघडतं; ते हृदय. हवं तर अंतःकरण म्हणा. ते एखाद्या कमलपुष्पासारखं असावं. त्यातून एक लहानसं कमळ उदित व्हावं; ते लहानसं कमळ म्हणजे हास्य.
        अर्थात हे समजणं थोडसं कठिण असेल. किंबहुना व्यक्त करणं कठिण असेल. पण खरं आहे.
        भगवंत म्हणजे काय? सत्वप्रधानता. तेथे विशुद्ध सात्विकता असते. मग भगवंताकडून आपले अहित कसे होईल? आपण का बरं तक्रार करीत बसतो? त्यांनी नक्कीच चांगली योजना केलेली असते. आपण अजाण असतो; त्या बद्दल.
        एक मात्र नक्की. भगवंताच्या व्यवस्थेत बिंब प्रतिबिंब भाव असतो. आरशासारखा....! जे द्याल, ते नक्कीच मिळेल.
        सहानुभूतीसाठी धडपडू नका. समानाभूतीस महत्त्व द्या. दुस-याच्या दुःखाने दुःखी आणि सुखाने सुखी व्हायला शिका.
        खरंच सांगतो, लोक नक्कीच साथ देतात. आपण विश्वास ठेवला पाहीजे- भगवंतावर, स्वतःवर आणि मित्रांवर! राजकारणाचं ठाऊक नाही; पण इतर सर्वच क्षेत्रात विश्वास ठेवता येऊ शकतो.
        हा ब्लाॅग त्या सर्वांना समर्पित; ज्यांनी हसवलंच, हसतंच रहायला लावलं. सहास्य प्रणाम; त्या लहान मोठ्या सर्वांमध्ये असणा-या चैतन्य तत्त्वाला!
        जय श्रीकृष्ण!

Thursday, 15 September 2016

यश आणि तत्त्वज्ञान

 व्यक्तीच्या यशस्वीतेत तत्त्वज्ञानाची भूमिका 

 प्रत्येक ठिकाणी फर्स्ट राहण्यापेक्षा चांगलं राहण्याचा प्रयत्न करा. फर्स्ट राहण्यासाठी स्पर्धा असेल, क्यु असेल, ईर्ष्या असेल. चांगलं राहण्यासाठी असं स्पर्धा इत्यादि काहीच नसेल. पण एक लक्षात ठेवा, तुमचा चांगुलपणा तुम्हाला अटल अद्वितीय असं स्थान देईल. ध्रुवबाळाला ओळखतंच असाल तुम्ही!
        बरं तुम्ही कितीही वेळेस स्पर्धा करून पहिलं स्थान मिळवलं तरीही कधी ना कधी ते रेकाॅर्ड मोडलं जाऊ शकतं.
        याचा अर्थ असा नाही की, यशासाठी प्रयत्न करू नयेत. यशासाठी नेहमी नेहमी प्रयत्न केलाच पाहीजे. पण तो कोणा दुस-याच्या नव्हे तर आपल्या स्वतःच्या पुढे जाण्यासाठी.
        "मी कालपेक्षा आज आणि आजच्या पेक्षा उद्या अधिक प्रज्ञावान प्रतिभावान यशस्वी असायला हवं" ही महत्वाकांक्षा माणसाला उच्चतम आणि उत्तमोत्तम यशशिखरापर्यंत घेऊन जाते.
        पण हे सारं करण्यासाठी व्यक्तीचा तात्विक पाया भक्कम असला पाहीजे. कोणतं तरी एक तत्त्वज्ञान त्याच्या जीवनाचं अविभाज्य असं अंग असलं पाहीजे. मला स्वतःला या संदर्भात योग आणि वेदांत ही दोन दर्शने महत्वाची वाटतात. योग माणसाच्या मनावर बाहेरील गोष्टींचे परिणाम थांबविण्यास शिकवितो. वेदांत मर्मदृष्टी देतो. अन्य दर्शनांची मतांची उपयुक्तता मी नाकारीत नाहीये. माझ्या अल्पशा अनुभवानुसार या दोन तत्त्वज्ञानांबद्दल मी लिहीतोय.
        स्वस्थ शरीर स्वस्थ मन योगाकडून करून घ्यावे. नि मग असे स्वस्थ मन भक्तिमय व्हावे. बुद्धीस वेदांत सिद्धान्तांचा वेध घेण्याच्या कार्यी लावावे. यातून एक तात्त्विक बैठक विकसित होते. या तात्त्विक बैठकीची यशस्वितेत एक यथार्थ भूमिका असते.
                                   (अपूर्ण)
JSK!!!

Sunday, 4 September 2016

"परस्परावलंबित्व, माणूस आणि आनंदाचा मार्ग."

"परस्परावलंबित्व, माणूस आणि आनंदाचा मार्ग."

         *मानवच काय, अगदी पशु पक्षी वनस्पती सर्वांचेच जीवन हे तसे काॅम्प्लेक्स असते. आणि याचे एक प्रमुख कारण परस्परावलंबित्व असण्याची शक्यता आहे.
         *गरजा कितीही कमी असो किंवा अधिक; त्यांची पूर्तता करण्यासाठी अन्य कोणावर तरी अवलंबून रहावे लागते.
         *उत्क्रान्तीच्या हजारो वर्षांच्या कालात सर्व जीवजंतूंना जगण्यासाठीचे परस्परावलंबित्व अंगवळणी पडले आहे. जगण्यासाठी श्वास घेणे आवश्यक आहे. आपण नित्य श्वास घेतो, न विसरता आणि म्हणूनच न आठवता देखील.
         *खरं तर या परस्परावलंबित्वाला काही लोक परावलंबित्व समजतात. पण वास्तव नाकारणं चूक होय. ऊलट आपण सर्वांना अधिकाधिक सहकार्य केले तर परस्परावलंबित्वात सहजता येते.
         *परावलंबित्वाचे वर्णन परस्परावलंबित्व असे केले पाहीजे. तुम्हाला न मागता मदत मिळेल असा प्रयत्न करा. ही सृष्टी तुम्ही जे द्याल ते तुम्हाला परत देणारंय. जिथून आज सहकार्य मिळाले नाही, तेथूनही उद्या लाभू शकते.
         *विज्ञान तंत्रज्ञानाने चहाचे यंत्र तयार केले. पण यंत्र बिघडल्यावर काय? नीट करण्यासाठी कोणाला तरी बोलवावे लागते. तेव्हा एकंदरच निसर्ग आणि मानव तसेच व्यक्ती व समाज यांच्यात एक परस्परावलंबित्व असते. ते अनिवार्य म्हणजे ज्याचे निवारण होऊ शकत नाही, असे असते.
         *सारांश, परस्परावलंबित्व नैसर्गिक आहे. त्याचा आदर करा. 'मै' ची जागा 'हम' ला द्या. स्वतःत किंवा अन्य कोणातही चूक पाहण्यापेक्षा बरोबर काय ते आपल्याला आधी दिसलं पाहीजे. बरोबर असणारा भाग वाढवत नेला की, चूकीचा भाग आपोआप कमी होतो.
         *खरं तर परस्परावलंबित्वामुळे माणूस दुःखी नाही. लोकांनी माझ्या अनुकूल तेच केले पाहीजे या हट्टामुळे माणूस दुःखी आहे. प्रत्येक जागी अनुकूल मार्ग मिळतो म्हणून नदी सागरापर्यंत पोचत नाही. पर्वत, द-या खोरे यांविषयी सद्भावना, ध्येयवाद, संयम आणि चिकाटी यांच्या सहाय्याने नदीला फायनल डेस्टिनेशनपर्यंत पोचता येते.
         *नगर निगमने पाणी सोडलं तर मला पाणी मिळेल, हे समजून घेता. पाऊस पडला तर पाणी मिळेल हे समजून घेता. भगवंताने कृपा केली, तर मला पाणी मिळेल, हे देखील समजून घ्यायला हवे ना? भगवंतावर आपला विश्वास असला पाहीजे ना? आपण भगवंतावर अवलंबून आहोत; हे समजून घ्यायला हवे ना?
         *माणसासाठी किती छान आहे की, तो नामस्मरण करू शकतो. सर्व विचार बाजूला ठेवा. एकाग्र व्हा. नामस्मरण करा. नामस्मरणाचा कल्पवृक्ष उपलब्ध आहे, या पेक्षा काय हवे? नामस्मरण हाच आनंदाचा यशाचा सोपा मार्ग आहे, असे मला तरी वाटते.

गुजरात विधानसभा निवडणुक चर्चा तर होणारच

गुजरात विधानसभा निवडणूकः चर्चा तर होणारच!              डॉ. चन्द्रहास सोनपेठकर गुजरात राज्याच्या विधानसभा निवडणूका जाहीर झाल्या आहेत. मीड...