मा. प्रा. डाॅ. दुर्गाडे सर: सर्वसमावेशकतेचे दुसरे नाव
गेली पाचवर्षाहून अधिक काळ आम्ही टिळक महाविद्यालयात एकत्र आहोत. अर्थात दुर्गाडे सर खूप सिनिअर आहेत. सरांची राजकारण समाजकारण अर्थकारण आणि शिक्षण या चारही क्षेत्रात जबरदस्त पकड आहे. सर्वप्रकारची यशस्विता असूनही विनम्रता असणं गुणग्राहकता असणं आणि सर्वसमावेशकता असणं या तीन गोष्टी सरांकडे अशा आहेत; ज्या कोणाच्याही मनाला सहज भावतील.
राजकारणात सक्रिय असूनही सर विरोधासाठी विरोध कधीच करीत नाहीत. एखाद्या व्यक्तीचे एखाद्या बाबतीतील विचार त्यांच्यापेक्षा कितीही भिन्न असले, तरीही समोरच्या व्यक्तीच्या विचारस्वातंत्र्याचा सर नेहमीच संमान करतात. कोणत्याही सकारात्मक कार्याला प्रोत्साहन देतात.
दिवसभराचे व्यस्त असे भौतिक आणि बौद्धिक वेळापत्रक सर सांभाळतात. हे कौशल्य त्यांच्याकडून शिकलं पाहीजे. बरं इतक्या व्यस्ततेतून सर वाचनासाठी केव्हा आणि कसा वेळ काढत असतील, हे त्यांनाच माहीत!
राजकारणात दुर्मीळ होत चाललेला साधेपणा त्यांनी जपलांय. त्यांनी समाजकारणात वैचारिक एकसूरीपणाला थारा दिलेला नाही. आर्थिक चिंतनातही डाव्या किंवा उजव्या विचाराच्या आग्रहापेक्षा संयुक्तिकतेला महत्व दिलंय. प्रबोधन, सुधारणा, बुद्धीप्रामाण्य, पुरोगामीत्व हे जसे त्यांच्या चिंतनाचे अविभाज्य भाग आहेत, तसेच कृतीचेही! पण तरीही "माझेच खरे" हा आग्रह नाही. तर "खरे ते माझे" अशी भूमिका सरांची असते.
लोकशाही मूल्यांबद्दल त्यांच्या मनात कमालीचा आदर आहे. हे मी अनुभवाने सांगू शकतो. कारण एकूण विचार क्षेत्राच्या किमान 10% विचारांत तरी आमच्यांत मतभिन्नता असण्याची शक्यता आहे. पण तरीही सरांसोबत काम करताना, चर्चा करताना कधी दडपण येत नाही. नक्कीच; दुर्गाडे सरांनी सर्वसमावेशकता जपली आहे.....
No comments:
Post a Comment